आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट...
चंद्रपूर जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा – रेल्वेमंत्र्यांकडून तातडीने कार्यवाहीचे आश्वासन
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीत बल्लारपूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न, चंद्रपूरातील मजूर कुटुंबांचे पुनर्वसन, तसेच व्यापाऱ्यांच्या कराराशी संबंधित समस्या याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
गोल पुलियाजवळ उड्डाणपूलाची मागणी
बल्लारपूर शहरातील गोल पुलिया हा नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे.
सध्या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचे काम सुरू असल्याने या भागातील वाहतूक अडथळलेली आहे.
नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे निदर्शनास आणले.
बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासावर भर
बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी विशेष बैठक घेऊन प्रवाशांच्या सोयीसुविधा सुधाराव्यात, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली.
स्थानकातील विद्यमान सुविधा, प्रवाशांच्या गरजा आणि भविष्यातील विस्तार याबाबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
चंद्रपूरातील मजूर कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा
चंद्रपूर रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी आणि लखमापूर परिसरात नवीन रेल्वे लाईनचे काम सुरू आहे.
मागील २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मजूर कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्या तातडीने पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
व्यापाऱ्यांच्या कराराचा प्रश्न पुन्हा चर्चेत
बल्लारपूर येथील रेल्वेच्या मालकीच्या जागेवर गेल्या ४०-४५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या करारांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
२००४ च्या रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार आणि २०११ च्या नागपूर मंडळाच्या सर्वेक्षणानुसार नवीन करारांना परवानगी असूनही व्यापाऱ्यांना अद्याप नवे करार मिळालेले नाहीत.
या व्यापाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी तातडीने निर्णय घेण्याची विनंती आमदार मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
सकारात्मक प्रतिसाद – तातडीने कार्यवाहीचे आश्वासन
या सर्व मुद्द्यांवर ना. अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बल्लारपूर आणि चंद्रपूर परिसराच्या जनतेच्या अपेक्षा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न नक्कीच फलदायी ठरेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
