Top News

महाराष्ट्रात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिंधीचकचा मानाचा तुरा; राज्यस्तरीय गुणांकनात प्रथम क्रमांक






नागभीड  : आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील शासकीय आश्रमशाळांच्या सर्वांगीण गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सन २०२५-२६ च्या राज्यस्तरीय गुणांकन स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चिंधीचक (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) यांनी ८१.२४ टक्के गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या उल्लेखनीय यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर आदिवासी विकास विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आदिवासी विकास मंत्रालयामार्फत अमरावती, ठाणे, नाशिक आणि नागपूर हे चार आदिवासी विकास विभाग कार्यरत असून त्यांच्या अखत्यारीत राज्यातील ५०४ शासकीय आश्रमशाळा आहेत. आदिवासी विकास आयुक्त मा. श्रीमती लिना बन्सोड यांच्या संकल्पनेतून ही गुणांकन स्पर्धा राबविण्यात आली.

या स्पर्धेत बाल हक्क संरक्षण प्रणाली, ई-निरीक्षण ॲपवरील निरीक्षणे, पायाभूत साक्षरता (भाषा), पायाभूत संख्याज्ञान (गणित) तसेच भाषा व गणिताच्या संयुक्त चाचण्या अशा विविध निकषांवर तीन स्वतंत्र संस्थांमार्फत मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये आम्ही आमच्या आरोग्यासाठी, माझी शाळा माझा स्वाभिमान, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन (दिल्ली) आणि वोपा या संस्थांनी मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली.

या राज्यस्तरीय गुणांकनात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिंधीचकने ८१.२४ टक्के गुणांसह प्रथम, शासकीय आश्रमशाळा झटाळा (अमरावती विभाग) ने ७२.१२ टक्के गुणांसह द्वितीय, तर शासकीय आश्रमशाळा देवमोगरा (नाशिक विभाग) ने ६६.९४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

या यशामागे शाळेतील सर्व विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सामूहिक परिश्रम आणि उत्कृष्ट टीमवर्क महत्त्वाचे ठरले. तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती जागृती कुंमरे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वाटाने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त मा. आयुषी सिंह यांनी २ जुलै २०२६ रोजी मुख्याध्यापकांचा विशेष गौरव केला. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त शाळांचा लवकरच विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिंधीचकने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Previous Post Next Post