Top News

नागभीड शहर व नगरपरिषद क्षेत्रातील गावांमध्ये पावसाळ्यात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तातडीने फवारणी, फॉगिंग, स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी अपक्ष नगरसेवक संजय अमृतकर यांनी केली.




नागभीड |  पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच नागभीड शहरासह नगरपरिषद क्षेत्रातील अनेक भागांमध्ये डास व विविध कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आणि नगरपरिषद क्षेत्रातील सर्व गावांमध्ये तातडीने औषध फवारणी, फॉगिंग, नाल्यांची स्वच्छता आणि विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी अपक्ष नगरसेवक संजय अमृतकर यांनी केली आहे.

नगरपरिषद क्षेत्रातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून दूषित वातावरणामुळे कॉलरा व इतर जलजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय अमृतकर यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे शहरातील रस्ते, नाल्या, मोकळे प्लॉट आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी नियमित औषध फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग), नाल्यांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा आणि कचरा उचलण्याची मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून पावसाळ्यात संसर्गजन्य व जलजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने कोणताही विलंब न करता प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, नागभीड शहरासह नगरपरिषद क्षेत्रातील सर्व गावांमध्ये विशेष स्वच्छता अभियान, डास प्रतिबंधक फवारणी आणि सातत्यपूर्ण आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.



Previous Post Next Post