भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून अरुण लखानीं तर नागपूर पोटनिवडणुकीत डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी.
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 तसेच नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची यादी जाहीर केली असून राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये पक्षाने अनुभवी व प्रभावी नेत्यांवर विश्वास दाखवला आहे.
भाजपने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातून अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेमुळे विदर्भातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील, सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव मतदारसंघातून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींच्या मतांवर ही निवडणूक अवलंबून असल्याने या मतदारसंघाकडेही विशेष लक्ष लागले आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपने तयारीला वेग दिल्याचे या घोषणेतून स्पष्ट होत आहे.
