Top News

Tiger Attack Chandrapur : गुंजेवाहीतील चार महिलांच्या मृत्यूची मुनगंटीवारांकडून गंभीर दखल; मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी AI प्रणालीची मागणी

Tiger Attack Chandrapur : गुंजेवाहीतील चार महिलांच्या मृत्यूची मुनगंटीवारांकडून गंभीर दखल; मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी AI प्रणालीची मागणी


चंद्रपूर : सिंदेवाही परिक्षेत्रातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेची माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी तातडीने आधुनिक आणि ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात कावडबाई दादाजी मोहूर्ले (45), अनिताबाई दादाजी मोहूर्ले (40), सुनिता कौशिक मोहूर्ले (38) आणि संगीता संतोष चौधरी (50) या चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर योगिता चंदपाल जेगटे या महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अप्पर मुख्य सचिवांसोबत चर्चा

या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. नुकसानभरपाई वेळेत मिळण्यासाठी ‘निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टिम’ लागू करण्याचीही त्यांनी सूचना केली.

त्यांच्या मते, निधीअभावी किंवा प्रशासकीय विलंबामुळे पीडित कुटुंबीयांना मदत मिळण्यात अडथळे येऊ नयेत. वन्यप्राणी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार 30 दिवसांच्या आत आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

AI आधारित अलर्ट सिस्टीमची मागणी

मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पूर्वसूचना प्रणाली, ड्रोन सर्व्हेलन्स, सेन्सर अलर्ट सिस्टीम, रिअल-टाईम ट्रॅकिंग आणि स्मार्ट मॉनिटरिंग यंत्रणा उभारण्याची गरज मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती नागरिकांना वेळेत मिळाल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. त्यामुळे वन विभागाने या घटनेकडे केवळ दुर्घटना म्हणून न पाहता भविष्यातील गंभीर इशारा म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वनमंत्री असताना घेतले होते महत्त्वाचे निर्णय

वनमंत्री पदावर कार्यरत असताना संवेदनशील भागांमध्ये जनजागृती मोहीम, वाघांचे स्थानांतरण, सतर्कता उपाययोजना आणि संघर्षग्रस्त भागात प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आले होते. वन्यजीवांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी मदत झाली होती.

तातडीच्या मदतीची मागणी

मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी वन विभागाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल राखताना नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post Next Post