Top News

शेतकऱ्यांना दिलासा ; नागभीड येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

शेतकऱ्यांना दिलासा ; नागभीड येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ



नागभीड : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५-२६ साठी नागभीड येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या माध्यमातून नागभीड तालुका खरेदी-विक्री सोसायटीला मंजूर झालेल्या या केंद्राचे उद्घाटन तहसीलदार महेश देशमुख यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष संजु उरकुडे होते.

नागभीड तहसील कार्यालयाजवळील शासकीय गोदामात आयोजित कार्यक्रमाला तालुका पुरवठा अधिकारी चांदेकर, सोसायटीचे उपाध्यक्ष रमेश पाटील बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संचालक संजय गजपुरे, संचालक आनंद कोरे, चंद्रशेखर विगम, राहुल सवाईकर तसेच गोदाम किपर रहांगडाले उपस्थित होते.

आमदार बंटी भांगडिया यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या मका खरेदी केंद्रामुळे नागभीड, चिमूर आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अडीचशेहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

कार्यक्रमात सर्वप्रथम वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी केलेल्या पहिल्या शेतकऱ्याच्या मका खरेदी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी तहसीलदार महेश देशमुख यांनी शेतकऱ्यांनी शासकीय नियमांचे पालन करून मका विक्री प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन केले. मका खरेदी संदर्भात कोणतीही अडचण असल्यास नागभीड तालुका खरेदी-विक्री सोसायटीशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले.

सोसायटीचे अध्यक्ष संजु उरकुडे यांनी नोंदणीकृत शेतकऱ्यांना मका खरेदीसंदर्भातील माहिती त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे संचालन संचालक संजय गजपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक महेश मेश्राम यांनी मानले. 

Previous Post Next Post