Top News

Fuel Stock Check : जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर...... साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद

Fuel Stock Check : जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर...... साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद


चंद्रपूर | पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होऊ नये, तसेच काळाबाजार आणि अवैध साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी थेट पेट्रोल पंपावर जाऊन तपासणी केली. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कोटपल्लीवार पेट्रोल पंपाला त्यांनी अचानक भेट देत साठा रजिस्टर, दैनंदिन स्टॉक आणि पुरवठा व्यवस्थेची पाहणी केली.

पेट्रोल-डिझेल पुरवठ्याची घेतली माहिती

जिल्हाधिकारी पंत यांनी पेट्रोल पंप चालकांकडून सध्याच्या परिस्थितीत तेल कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत आहे का, मागील आठवड्याच्या तुलनेत परिस्थितीत सुधारणा झाली का, दररोज किती टँकर येतात, ग्राहकांची गर्दी वाढली आहे का, यासह विविध बाबींची माहिती घेतली.

औद्योगिक जिल्हा असल्यामुळे मोठ्या वाहनांचा इंधन पुरवठा कुठून होतो, तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना किती प्रमाणात पेट्रोल-डिझेल देण्यात येते, याबाबतही त्यांनी चौकशी केली.

काळाबाजार रोखण्याचे निर्देश

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल विक्री करणे अनधिकृत असल्याचे स्पष्ट करत अशा प्रकारांना आळा घालण्याचे निर्देश दिले. तसेच दररोज उपलब्ध असलेल्या इंधन साठ्याची माहिती दर्शनी भागात फलकावर लावण्याच्या सूचना त्यांनी पेट्रोल पंप चालकांना केल्या. पेट्रोल-डिझेलची काळाबाजारी किंवा अवैध साठेबाजी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

ग्राहकांशी थेट संवाद

पेट्रोल पंप भेटीदरम्यान जिल्हाधिकारी पंत यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधत इंधन पुरवठ्याबाबत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “टंचाईमुळे जास्त पेट्रोल भरत आहात का?”, “कधी पेट्रोल मिळाले नाही का?”, “इंधनात कपात केल्याचा अनुभव आला का?” अशा प्रश्नांद्वारे त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील इंधन साठा किती?

२४ मे २०२६ अखेर जिल्ह्यात पेट्रोलचा एकूण साठा ९ लाख ७८ हजार ५७१ लिटर इतका होता. त्यापैकी २ लाख २२ हजार ६५९ लिटर विक्री झाली असून ७ लाख ५५ हजार ९१२ लिटर साठा शिल्लक आहे.

तर डिझेलचा एकूण साठा ११ लाख ९ हजार १६२ लिटर असून त्यापैकी ४ लाख २३ हजार ७६० लिटर विक्री झाली आहे. सध्या ६ लाख ८५ हजार ४०२ लिटर डिझेल शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

याशिवाय एलपीजी सिलिंडरचा एकूण साठा १७ हजार ४४८ असून त्यापैकी ६ हजार ५६७ सिलिंडरची विक्री झाली आहे. सध्या १० हजार ८८१ सिलिंडर उपलब्ध आहेत.

प्रशासन सतर्क

जिल्हाधिकारी यांच्या या अचानक पाहणीमुळे जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्याबाबत सतर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. अफवांमुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये आणि पुरवठा सुरळीत असल्याने घाबरून इंधन साठवणूक टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post Next Post