Top News

T-2 Tigress Captured : चार महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद

 T-2 Tigress Captured : चार महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद



चंद्रपूर |  सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर टी-२ वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. शनिवारी रात्री पवनपार तलाव परिसरात विशेष पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत ट्रॅन्क्युलायझर डार्टच्या सहाय्याने वाघिणीला बेशुद्ध करून ताब्यात घेतले. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी जंगलालगतच्या गावांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे.

गुंजेवाही हल्ल्यानंतर वनविभागाची मोठी शोधमोहीम

दोन दिवसांपूर्वी गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला केला होता. या भीषण घटनेत सुनीता मोहूर्ले, संगीता चौधरी, अनीता मोहूर्ले आणि कविता मोहूर्ले या चार महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. सलग झालेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली होती.

घटनेनंतर वनविभागाने संपूर्ण परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. हल्लेखोर वाघिणीचा मागोवा घेण्यासाठी गुंजेवाही जंगल परिसरात २० ट्रॅप कॅमेरे आणि ३ मोशन सेन्सर लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच विशेष पथकाद्वारे दिवस-रात्र गस्त वाढविण्यात आली होती. वनाधिकारी, ट्रॅक्विलायझर टीम, तज्ज्ञ डॉक्टर आणि बचाव पथक सतत जंगल परिसरात तैनात होते.

पवनपार बीटमध्ये थरारक कारवाई

वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवनपार बीट कक्ष क्रमांक २८२ परिसरात शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कॅमेरा ट्रॅप आणि पगमार्कच्या आधारे वाघिणीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. रात्री सुमारे ७.१५ वाजता विशेष पथकाने वाघिणीवर ट्रॅन्क्युलायझर डार्टद्वारे वेध घेतला.

सुरुवातीला अंधारामुळे डार्ट लागलेला प्राणी नेमका हल्लेखोर वाघ आहे की अन्य वाघ, याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पडताळणीनंतर तीच टी-२ हल्लेखोर वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास तिला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले.

बछड्यांचा शोध सुरू

कारवाईदरम्यान वाघिणीसोबत तिचे बछडे नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बछड्यांच्या हालचाली आणि सद्यस्थितीबाबत वनविभाग स्वतंत्र तपास करणार असल्याचे समजते. पकडण्यात आलेली वाघीण हीच चार महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची प्राथमिक खात्री वनविभागाने व्यक्त केली असून पुढील वैद्यकीय तपासणी, डीएनए नमुने आणि कॅमेरा ट्रॅपच्या आधारे अंतिम पडताळणी करण्यात येणार आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा ऐरणीवर

वाघिणीला पकडण्यात यश आले असले तरी जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन, शेतीची कामे आणि जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये अजूनही भीती कायम आहे. ग्रामस्थांनी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना, जंगल परिसरात सतर्कता यंत्रणा आणि वनविभागाची नियमित गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

Previous Post Next Post