Top News

Tiger Terror in Chandrapur : तेंदूपत्ता हंगाम रक्तरंजित; गुंजेवाहीत वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू

Tiger Terror in Chandrapur : तेंदूपत्ता हंगाम रक्तरंजित; गुंजेवाहीत वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू


चंद्रपूर |  नागभीड तालुक्यातील किटाडी मेंढा परिसरात 19 मे रोजी तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने थैमान घालत चार महिलांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामीण भागात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरातील जंगलात आज सकाळच्या सुमारास काही महिला तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलांमध्ये सुनीता कौशिक मोहुर्ले (35), संगीता संतोष चौधरी (40), अनीता दादाजी मोहुर्ले (45) आणि कविता दादाजी मोहुर्ले (48) यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती गावात पोहोचताच एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी जंगल परिसराकडे धाव घेतली. घटनास्थळी भीषण दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

जंगलात जाण्याची भीती वाढली

दरवर्षी हजारो महिला आणि मजूर तेंदूपत्ता हंगामात जंगलात जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. “तेंदूपत्ता तोडायला जंगलात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे झाले आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कुटुंबांना मदतीची मागणी

मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Previous Post Next Post