दशरथ जमधाडे यांच्यावरील पुस्तक म्हणजे कार्यकर्त्यांसाठी मौलिक दस्तऐवज - प्रा.दामोदर मोरे
'कार्यकर्त्यांच्या मनोभूमीत आंबेडकरी जाणिवेचा झेंडा फडकवणारे गंभीर आणि खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे दशरथ जमधाडे होत. आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते
घडविण्यात ते यशस्वी झाले आहेत याची साक्ष म्हणजे शांताबाई मोरे यांनी संपादित केलेले 'आंबेडकरी जाणिवेचे कार्यकर्ते घडविणारे ऊर्जावान व्यक्तित्व दशरथ जमधाडे' हे पुस्तक होय. कार्यकर्त्यांच्या मानसिक जडणघडणीसाठी हे पुस्तक म्हणजे मौलिक दस्ताऐवज आहे.' असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत, मराठी हिंदी साहित्यिक प्रा.दामोदर मोरे यांनी केले. शांताबाई मोरे संपादित 'आंबेडकरी जाणिवेचे कार्यकर्ते घडविणारे उर्जावान व्यक्तिमत्व दशरथ जमधाडे' या जमदाडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त विश्वा लाॅन्स सभागृह , रिसोड जि. वाशीम येथे प्रकाशित झालेल्या शानदार समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
दशरथ जमधाडे यांच्या कर्तृत्वाचे शब्द शिल्प असणाऱ्या या गौरव ग्रंथाचे प्रकाशन अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले, "बुद्ध ते कांशीराम व्हाया फुले शाहू आंबेडकर हा वैचारिक प्रवास पचवून समाज परिवर्तन घडविणे हे आव्हानात्मक कार्य आहे. मानवतावादी व परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या बेरजेचे पूण्य पेरण्याची गरज आहे. त्याशिवाय भारताचा आणि विश्वाचा उद्धार होणार नाही. समाज बदलासाठी समर्पित कार्यकर्त्यांची फौज घडविणारे दशरथ जमधाडे हे संवाद आणि संघर्षवादी समर्पित व्यक्ती आहेत. कोकण ते विदर्भ हा पट्टा त्यांच्या
प्रबोधनाच्या कार्याची पावती आहे.'
या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती दशरथ जमधाडे यांचेही या वेळी भावपूर्ण आणि मर्मस्पर्शी भाषण झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश टाकळीकर, एड.राहुल गवई, संपादक शांताबाई मोरे, दत्तराव धांडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेमके आणि नेटके सूत्रसंचालन निवेदक चाफेश्वर गांगवे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल जमधाडे यांनी केले.
या कार्यक्रमास कवी अनिल कांबळे, शाहीर विठ्ठल गायकवाड यांच्यासह इतर साहित्यिक, साहित्यप्रेमी, शहरातील आणि बाहेरील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना स्वादिष्ट भोजन दान देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
