Top News

प्रकल्पग्रस्तांना रोजगार न दिल्यास मनसेचा खळखट्याक; केविआर कंपनी व वेकोली प्रशासनाला इशारा

 प्रकल्पग्रस्तांना रोजगार न दिल्यास मनसेचा खळखट्याक; केविआर कंपनी व वेकोली प्रशासनाला इशारा



चंद्रपूर, ता. — वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील सिनाळा, मसाळा व नवेगाव येथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

वेकोलीमार्फत कोळसा खाण प्रकल्पासाठी या तिन्ही गावांतील शेतजमिनी व घरे अधिग्रहित करून पुनर्वसन करण्यात आले. मात्र, प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना केविआर कंपनीकडून रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमन अंधेवार यांनी सांगितले की, प्रकल्प उभारणीच्या वेळी स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना रोजगार दिला जात असून स्थानिक युवकांना डावलण्यात येत आहे. ही बाब अन्यायकारक असून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.

या संदर्भात मनसे कामगार सेनेच्या वतीने वेकोली प्रशासन व केविआर कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर ‘खळखट्याक’ आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास वेकोली प्रशासन व संबंधित कंपनी जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, राज वर्मा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post