Top News

घोडपेठ येथे ‘प्रशासन आपल्या दारी’ शिबिरात नागरिकांच्या समस्या तत्काळ निकाली

 घोडपेठ येथे ‘प्रशासन आपल्या दारी’ शिबिरात नागरिकांच्या समस्या तत्काळ निकाली



भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : तालुक्यातील घोडपेठ येथे शुक्रवारी ‘प्रशासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत महाराजस्व शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच ग्रामपातळीवरील महसुली व इतर प्रलंबित समस्यांचा तत्काळ निपटारा करण्यात आला.


या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार करण देवतळे उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाले, तहसीलदार राजेश भांडारकर, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी बालाजी कदम, दुय्यम निबंधक विजय झाडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिबिरात विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना सातबारा उतारे वितरण, इंदिरा गांधी योजना, उत्पन्न दाखले, शिधापत्रिका, ‘लखपती दीदी’ योजना, सहकार, कृषी व आरोग्य योजनांचे लाभ देण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांची कामे एकाच ठिकाणी सोयीस्करपणे पूर्ण झाली.


यावेळी उपजिल्हाधिकारी अतुल जटाले यांनी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करून प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. या शिबिरामुळे नागरिकांना दिलासा मिळून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post