नागभीडमध्ये वाघाचा कहर; दोन जणांचा मृत्यू, तातडीने उपाययोजनांची मागणी – संजय गजपूरे
नागभीड : नागभीड तालुक्यात चालू महिन्यात वाघाच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपा नेते संजय गजपूरे यांनी केली आहे.नागभीड तालुका आणि परिसरात यापूर्वीही शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलालगत असलेल्या शेतीवर काम करण्यास शेतकरी घाबरत असून अनेकांनी शेतात जाणे टाळले आहे. यामुळे शेतीकामावरही मोठा परिणाम होत आहे.
जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षभरात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. वर्ष 2025 मध्ये एकूण 47 मृत्यू, त्यापैकी 42 मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याची नोंद आहे. याशिवाय बिबट्या, अस्वल यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातही अनेक नागरिक जखमी झाले आहेत.या संघर्षाचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होत आहे. मोहफूल (मोहा) संकलन हे स्थानिकांसाठी महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असले तरी वाघाच्या भीतीमुळे जंगलात जाण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामी, स्थानिक रोजगारावरही संकट निर्माण झाले आहे.मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्यामागे जंगल परिसरात वाढती मानवी वस्ती, पाण्याची व अन्नाची कमतरता, जनावरांची मुक्त चराई तसेच जंगलात जाणाऱ्यांची वाढती संख्या ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते.या पार्श्वभूमीवर संजय गजपूरे यांनी पुढील उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे:
- संवेदनशील भागात कॅमेरा ट्रॅप व ड्रोनद्वारे निगराणी वाढवणे
- वाघांच्या हालचालींबाबत तात्काळ सूचना देणारी यंत्रणा सुरू करणे
- धोकादायक वाघांचे स्थलांतर करणे
- जंगलालगत सोलार फेन्सिंग उभारणे
- स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संयुक्त उपाययोजना राबवणे
याशिवाय वनरक्षकांची गस्त वाढवून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक असून एकट्याने जंगलात न जाणे, सकाळ-संध्याकाळ सतर्कता ठेवणे, वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ माहिती देणे व समूहानेच शेतात जाणे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“नागभीड तालुक्यात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे,” असे मत संजय गजपूरे यांनी व्यक्त केले.
