धानाचे पैसे रखडले; कर्जफेडीच्या मुदतवाढीसाठी नागभीडमधील शेतकरी चिंताग्रस्त
नागभीड : बाळकृष्ण उंबरकर/ विशेष प्रतिनिधी (9637199875) - शासकीय खरेदी केंद्रात धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तब्बल चार महिने उलटूनही पैसे मिळाले नसल्याने नागभीड तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. धान विक्रीचे बिलही अनेक शेतकऱ्यांचे अद्याप तयार झाले नसल्यामुळे त्यांची अडचण अधिकच वाढली आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे धान शासनाकडे विक्रीस दिले असताना, वेळेत पैसे न मिळाल्याने त्यांना मजुरांची मजुरी, घरखर्च आणि इतर दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. याचदरम्यान, बिनव्याजी कर्जफेडीची अंतिम मुदत ३१ मार्च होती. मात्र धानाचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी कर्जफेड करू शकले नाहीत. परिणामी आता त्यांना व्याजासह कर्जफेड करावी लागणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, “शासनाने वेळेत धानाचे पैसे दिले असते तर कर्जफेड सहज शक्य झाली असती. सध्याची परिस्थिती ही अन्यायकारक आहे.”
या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी शासनाकडे मागणी केली आहे की,
धान विक्रीची प्रलंबित बिले तातडीने तयार करून पैसे वितरित करावेत
कर्जफेडीची बिनव्याजी मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी
यासाठी शासनाने बँकांना आवश्यक आदेश द्यावेत
दरम्यान, सेवा सहकारी संस्था मौशी (र. नं. ६७५) यांच्या मासिक सभेत संचालक मंडळाने यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर केला असून हा ठराव तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्याचे निर्देश सचिवांना देण्यात आले आहेत.
शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
