घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा; नागभीडमध्ये अर्धवट घरांवर ताडपत्रीचा आधार
नागभीड : बाळकृष्ण उंबरकर / विशेष प्रतिनिधी (9637199875) : केंद्र शासनाच्या आवास योजनेअंतर्गत टप्पा १ मध्ये घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम स्लॅब लेव्हलपर्यंत पूर्ण केले असतानाही पुढील आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही.
योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्यास एकूण १ लाख ३० हजार रुपये अनुदान, तसेच रोजगार हमी योजनेतून १८ हजार रुपये, अशी एकूण १ लाख ४८ हजार रुपयांची मदत देण्यात येते. मात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात सध्या केवळ १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.
दरम्यान, बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विटा, रेती, सिमेंट, सळाख तसेच मजुरीचा खर्च वाढल्यामुळे दोन खोल्यांच्या घरासाठी अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना अर्धवट घरांवर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ आली आहे.
लाभार्थ्यांच्या मते, “अनुदान वेळेवर मिळाले असते तर घरांचे बांधकाम पूर्ण झाले असते. सध्याच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींमुळे काम ठप्प झाले आहे.” यामुळे नागभीड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे आवास योजनेचे प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करावेत, अशी मागणी केली आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
