Top News

संकल्प ते सिद्धी चा नारा; १६३० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, २०२७ साठी १० हजारांचा संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार

‘संकल्प ते सिद्धी’चा नारा; १६३० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, २०२७ साठी १० हजारांचा संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार




चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गांधी चौक येथे आयोजित कार्यक्रमात ‘संकल्प ते सिद्धी’ या मूलमंत्रावर भर देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने काम करण्याचे भावनिक आवाहन केले. यावेळी चंद्रपुरातील विविध पक्षांतील तब्बल १६३० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून पक्षाच्या संघटनात्मक बळात मोठी भर घातली.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचे भगवा दुपट्टा परिधान करून स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी भाजपाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेतला. “राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः” हा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने आचरणात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्ह्यात २०२७ पर्यंत १० हजार सक्रिय कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच, ६ एप्रिल २०२७ रोजी चांदा क्लब मैदानावर भव्य स्वरूपात भाजपा स्थापना दिन साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.

मुनगंटीवार यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा उल्लेख करत पक्षाच्या ‘एकात्म मानववाद’ व ‘अंत्योदय’ या तत्त्वांवर आधारित वाटचालीचे महत्त्व अधोरेखित केले. “संघटन मजबूत असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना समाजाभिमुख आणि सजग राहण्याचे मार्गदर्शन केले.

दरम्यान, आणीबाणीच्या काळातील संघर्षाची आठवण करून देत त्यांनी लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना आदरांजली वाहिली. “हा भगवा दुपट्टा केवळ वस्त्र नाही, तर त्यात राष्ट्रभक्तीची परंपरा दडलेली आहे,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.

चंद्रपूर शहरातील तुकम, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प, विवेक नगर, बाबूपेठ, भानापेठ, पडोली, धानोरा पिपरी, मोरवा आदी भागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केला. अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील नागरिकांचाही यात सहभाग होता.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, विजय राऊत, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post