Top News

मक्का खरेदी नोंदणी सुरू; हरभरा नोंदणीला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ – आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

मक्का खरेदी नोंदणी सुरू; हरभरा नोंदणीला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ – आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश


चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून मक्का खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यासह हरभरा नोंदणीस मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या दुहेरी निर्णयामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

रब्बी पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान व भरडधान्य (मक्का) खरेदीसाठी १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना आदेश प्राप्त झाले असून खरेदी केंद्रांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मक्का उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊन हमीभावाने विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, हरभरा (चना) पिकाच्या नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ६ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार हरभरा नोंदणीची मुदत १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी नोंदणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त संधी मिळाली आहे.

आ. मुनगंटीवार यांनी मक्का खरेदी नोंदणी सुरू करण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांना पत्र देऊन ठोस पाठपुरावा केला होता. तसेच हरभरा नोंदणी मुदतवाढीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही विषय मांडत सातत्याने प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यांच्या जगण्याशी निगडित मुद्दा म्हणून त्यांनी हा विषय हाताळला.

चंद्रपूर जिल्ह्यात मक्का व हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मात्र, खरेदी व्यवस्थेतील विलंब, बाजारपेठेचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि वेळेअभावी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता वेळेत ऑनलाईन नोंदणी करून शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होता येणार असून त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांनी मक्का नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत तसेच हरभरा नोंदणीसाठी १५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान यावे आणि त्यांच्या कष्टाला योग्य मूल्य मिळावे, या उद्देशाने आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Previous Post Next Post