8 एप्रिलपासून सुरू उपक्रमांचा 14 एप्रिलला भव्य समारोप; नागभीड आयटीआय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव
विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावे : अजय काबरा
नागभीड : आचार्य प्रफुल्लचंद्र रे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभीड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. 8 एप्रिलपासून सुरू झालेल्या या उपक्रमांचा समारोप 14 एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.
जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, धावणे यांसारख्या विविध खेळांचा समावेश होता. तसेच मुलींसाठी रांगोळी स्पर्धा, मेहेंदी स्पर्धा, लेझीम, दोरीउडी (स्किपिंग) आणि संगीत खुर्ची (म्युझिकल चेअर) यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
समारोप कार्यक्रमास संस्थेचे IMC सदस्य अजय काबरा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून शक्ती केराम उपस्थित होते. कार्यक्रमास गटनिदेशक प्रा. चौधरी, ज्येष्ठ शिल्प निदेशिका वाराणशीवार , तसेच शि.नि. प्रा. प्रदीप मेश्राम, भूषण राऊत, नंदागवली , राऊत , कावळे , नंदेश्वर , डोंगरे यांच्यासह सर्व निदेशक, निदेशिका व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व आय.टी.आय. संस्थांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन अजय काबरा यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना केले. तर प्रमुख वक्ता शक्ती केराम यांनी शिक्षण हे बुद्धीला सत्याकडे नेणार असावं , शिक्षण हे माणसाला भावनेकडे घेऊन जाणार असावं , शिक्षण हे शरीराला समाजाकडे घेऊन जाणार असावं असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शि.नि. प्रा. प्रदीप मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन भूषण राऊत यांनी केले.
