Top News

हसऱ्या वातावरणात मृत्यूची एन्ट्री! विजेच्या धक्क्याने महिलेचा अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

हसऱ्या वातावरणात मृत्यूची एन्ट्री! विजेच्या धक्क्याने महिलेचा अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर



नागभीड : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या लग्न समारंभावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना नागभीड येथे घडली. कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुरावजी कायरकार (रा. नागभीड) यांची मुलगी स्नेहा विशाल वरभे (रा. भद्रावती) या आपल्या भावाच्या लग्नासाठी नागभीड येथे आल्या होत्या. दिनांक १२ एप्रिल रोजी विवाह सोहळा पार पडला होता, तर १३ एप्रिल रोजी स्वागत समारंभाची तयारी सुरू होती. घरात पाहुण्यांची मोठी गर्दी असल्याने स्नेहा या घरकामात मदत करत होत्या.

दरम्यान, खाली पडलेले कपडे वाळत टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. त्या जागीच कोसळल्याने त्यांना तातडीने स्थानिक खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथे पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले असून लग्नघरावर शोककळा पसरली आहे. मृत स्नेहा यांच्या पश्चात पती व १४ वर्षांची जुळी मुले असा परिवार आहे. घटनेमुळे नागभीड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post