Top News

जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा : रुग्णालयाची पाहणी, रुग्णांशी थेट संवाद

 जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा : रुग्णालयाची पाहणी, रुग्णांशी थेट संवाद


चंद्रपूर : संदीप तेलंग - उपजिल्हा प्रतिनिधी ::  पदभार स्वीकारताच प्रशासनाला गती देत नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध शासकीय यंत्रणांच्या पाहणीचा धडाका लावला आहे. गुरुवारी गॅस एजन्सीला अचानक भेट दिल्यानंतर शुक्रवारी (दि. १०) त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जाऊन सविस्तर पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

🏥 स्वच्छता व सुविधांवर भर

रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी पंत यांनी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि कॅन्टीनची योग्य व्यवस्था करण्यावर भर दिला. तसेच, निर्माणाधीन सुलभ शौचालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांसाठी बसण्याची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

👶 बालरुग्ण व नवजात विभागाबद्दल समाधान

जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील विविध तपासणी कक्षांचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळावा, असे सांगत त्यांनी नवजात बालकांच्या सेवांबाबत समाधान व्यक्त केले. डॉक्टर्स आणि स्टाफकडून बालकांची उत्तम काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

🗣️ रुग्णांशी थेट संवाद

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी पंत यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “बाळाची तब्येत कशी आहे?”, “जेवणाची व्यवस्था कशी आहे?”, “सीटी स्कॅनसाठी किती रुग्ण येतात?” अशा प्रश्नांद्वारे त्यांनी सेवा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी दररोज १२०० ते १५०० रुग्णांची ओपीडी नोंद होत असल्याची माहिती दिली.

🔍 विविध विभागांची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन कक्ष, अतिदक्षता विभाग, बालरुग्ण कक्ष, नवजात अतिदक्षता कक्ष, ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, एक्स-रे, पोषण व पुनर्वसन केंद्र, भौतिकोपचार विभाग, दंत विभाग, नर्सिंग कॉलेज आदी विभागांची पाहणी केली.

🏗️ नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला भेट 

यानंतर त्यांनी बल्लारपूर मार्गावरील निर्माणाधीन कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली. प्रलंबित कामांचा आढावा घेत लवकरच विशेष बैठक घेऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नवीन ठिकाणी रुग्णालय स्थलांतर सुलभ व्हावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🔴 जिल्हाधिकाऱ्यांच्या या सक्रिय दौऱ्यामुळे आरोग्य व्यवस्थेला गती मिळणार असून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post