Top News

नागभीडमध्ये नागरिक त्रस्त; भाजपचे निवेदन, civic issues वर तातडीच्या कारवाईची मागणी • मागण्या न पूर्ण झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

 नागभीडमध्ये नागरिक त्रस्त; भाजपचे निवेदन, civic issues वर तातडीच्या कारवाईची मागणी


• मागण्या न पूर्ण झाल्यास जनआंदोलनाचा इशारा


नागभीड : शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्ष नगरसेवकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख यांना निवेदन सादर केले. नगरपरिषद निवडणुकीनंतर सुमारे तीन महिने उलटूनही मूलभूत सुविधा सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निवेदनात शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनेक भागांत ७ ते ८ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय नाल्यांची साफसफाई व दुरुस्ती वेळेवर न झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचे प्रमाणही वाढले आहे.

तसेच शहरातील मोकाट डुकरे व जनावरांचा बंदोबस्त करणे, गरजूंना मालकी हक्काचे पट्टे देणे, घरकुल लाभार्थ्यांना निधी वितरित करणे, कापलेले नळ कनेक्शन पूर्ववत करणे आणि नवीन नळ जोडणी तातडीने देणे, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. खैरीचक व पंचायत समिती परिसरातील नळजोडणीचा प्रश्नही प्रलंबित असल्याचे यामध्ये नमूद आहे.

घरपट्टी व पाणीपट्टी बिलांतील त्रुटी दूर करणे, शहरात नियमित औषध फवारणी करणे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे यांसह अनेक मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. शहरातील कचऱ्याचे ढिगारे व गटारांची दयनीय अवस्था यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

वरील सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करून शहरातील परिस्थिती सुधारावी, अन्यथा नागरिकांच्या सहकार्याने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे.

निवेदन देताना भाजपा गटनेते गणेश तर्वेकर, नगरसेवक अवेश पठाण, सचिन आकुलवार, हेमंत नन्नावरे, नगरसेविका प्रिया लांबट, शिल्पा शेंडे तसेच स्वीकृत नगरसेवक प्रा. डॉ. अमीर धमानी उपस्थित होते.

Previous Post Next Post