Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल प्रश्न निकाली लावण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार

चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल प्रश्न निकाली लावण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार


महसूल प्रधान सचिव विकास खारगे यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा — कोठारी येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाच्या पदभरतीची मागणी, ५२ तलाठी कार्यालयांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश




चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महसूल विषयक प्रश्नांबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वेसंबंधी मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर आता महसूल विषयक मुद्यांवर त्यांनी प्रधान सचिवांशी बैठक घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

या भेटीत आ. मुनगंटीवार यांनी कोठारी येथे मंजूर झालेल्या अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाच्या पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली. जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी ही पदभरती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, जिल्ह्यातील ५२ तलाठी कार्यालयांमधील सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत अशी सूचना देत, नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित असलेल्या या कार्यालयांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधनसामग्री व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी आवाहन केले.

आ. मुनगंटीवार यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांना चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून स्थानिक अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याची विनंती केली.
या दौऱ्यामुळे प्रलंबित महसूल विषयक प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली असून, जिल्ह्याच्या प्रशासनिक कामकाजात गतिमानता येण्यासाठी हा संवाद फलदायी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post Next Post