नागभीड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रमाचा शुभारंभ
नागभीड – शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवनवीनता विभागांतर्गत व व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP) चा शुभारंभ नागभीड येथील आचार्य प्रफुलचंद्र रे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे मान्यवर उपस्थित होते.
नागभीड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संजयजी गजपुरे तर होमराज हरी गायकवाड, (अशोका फर्निचर अँड टिंबर मार्ट) ,आय एम सी सदस्य अजय काबरा (समिधा सेवा संस्था) व ज्ञानेश्वर डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संकल्पक मंगल प्रभात लोढा, (मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवनवीनता, महाराष्ट्र राज्य) असून प्राचार्य आर. एम. डांगरे, गट निर्देशिका वि.ए. वाराणशीवार, जिल्हा व्यावसाय शिक्षण अधिकारी एम. एम. बोंगिरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
🟠 संजय गजपुरे (माजी जिल्हा परिषद सदस्य)
“या अल्पकालीन रोजगारक्षम उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. कौशल्यविकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचा पाया अधिक भक्कम होईल.”
🔵 अजय काबरा (सदस्य, समिधा सेवा संस्था)
“समिधा सेवा संस्थेचा नेहमीच उद्देश स्थानिक युवकांना शिक्षण आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रात सक्षम बनवण्याचा राहिला आहे. अशा सरकारी योजनांमुळे युवाशक्तीला दिशा मिळते, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.”
🟢 आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया (आमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र)
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून सुरु झालेला हा कार्यक्रम ग्रामीण भागातील औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय ठरेल. प्रत्येक युवकाने या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन ‘नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा’ बनावे, हीच अपेक्षा.” आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी या शुभेच्छा व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना उद्योग-संरेखित आणि नवयुगीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगारक्षम प्रशिक्षणाची नवी दालने खुली होणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन शिल्पनिदेशक डी. बी. केंद्रे यांनी याठिकाणी सुरू होत असलेल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांची माहिती दिली . संचालन शिल्पनिदेशक प्रदिप मेश्राम यांनी केले तर आभार बी.एम. राऊत यांनी मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.


