Top News

राजुरात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; हजारोंच्या उपस्थितीत प्रशासनाचे लक्ष वेधले — “सातबारा कोरा करा”च्या घोषणा; शासनाला २७ मागण्यांचे निवेदन

राजुरात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; हजारोंच्या उपस्थितीत प्रशासनाचे लक्ष वेधले — “सातबारा कोरा करा”च्या घोषणा; शासनाला २७ मागण्यांचे निवेदन





राजुरा : शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिला. राजुरा तालुका काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांच्या वतीने शनिवारी आयोजित जनआक्रोश मोर्चा उत्स्फूर्तपणे पार पडला.

भवानी माता मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा”, “शेतकरी एकता जिंदाबाद” आणि “फसव्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी राजुरा शहर दणाणून गेले.

“मतचोर आमदारांची सदस्यता रद्द करा” — माजी आमदार धोटे

“चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही अद्याप ओला दुष्काळ घोषित झालेला नाही. मतचोरी करून निवडून आलेल्या अशा आमदारांची सदस्यता रद्द करून पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात,” अशी मागणी करत माजी आमदार धोटे म्हणाले की, “जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या सरकारविरुद्ध आता जनआक्रोश उफाळून येईल. शेतकरी आणि जनसामान्यांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेसचा लढा सातत्याने सुरू राहील.”

 “लूट आणि दिशाभूल हेच सरकारचे काम” — खासदार प्रतिभा धानोरकर

खासदार प्रभाती धानोरकर म्हणाल्या, “केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. मतांची चोरी करून सत्तेत आलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय न करता फक्त लूट आणि दिशाभूल करत आहे.”

शासनाकडे २७ ठोस मागण्या

मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २७ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —

  • शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करणे

  • ओला दुष्काळ जाहीर करून आपत्तीग्रस्तांना भरपाई देणे

  • महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेणे

  • बोगस मतदार नोंदणी प्रकरणी कारवाई करणे

  • खतांचा कृत्रिम तुटवडा दूर करणे

  • कापूस व सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज

  • कृषिपंपांना नियमित वीजपुरवठा

तसेच अतिक्रमणधारकांना पट्टे देणे, तरुणांना स्थानिक रोजगार, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ पेन्शन वाढवणे, महिला बचत गटांना व्याजमाफी, तसेच रस्ते व जलजीवन मिशनची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे अशा मागण्यांचाही समावेश आहे.

 “मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन” — काँग्रेसचा इशारा

शासनाने या मागण्या तातडीने मान्य न केल्यास अधिक उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

या वेळी खासदार प्रभाती धानोरकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कामगार काँग्रेसचे सुरज ठाकरे, सभापती विकास देवाळकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, तसेच काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनआक्रोश मोर्चाच्या घोषणांनी आणि शेतकऱ्यांच्या आवाजाने राजुरा शहराचे वातावरण पेटून उठले.

Previous Post Next Post