Top News

अलवीदा - मनसे : राज ठाकरेंना मोठा धक्का ; भाजपा - महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहिर केल्याने पक्षातील बड्या नेत्याने सोडली साथ.....

अलवीदा - मनसे :  राज ठाकरेंना मोठा धक्का ; भाजपा - महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहिर केल्याने पक्षातील बड्या नेत्याने सोडली साथ.....

देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राज ठाकरे यांनी राजकीय भूमिका बदलली - कीर्तिकुमार शिंदे




विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई 

गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठींबा देत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंना मोठा धक्का मिळाला आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबूकला एक पोस्ट शेअर करत मनसेला अलविदा केलं आहे.

परखड शब्दांत कीर्तीकुमार शिंदेंची पोस्ट

"महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे..." अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झालं.", असं मत कीर्तिकुमार शिंदेंनी पोस्टमधून व्यक्त केलंय.

'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो

कीर्तिकुमार शिंदे यांनी पुढे साल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करून देत लिहिलं की, "पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर-'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे विचार मांडत होते. त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो."

हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका

"आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?" असा सवाल कीर्तिकुमार शिंदेंनी विचारला आहे.

Previous Post Next Post