Top News

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

 






नागभीड : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथील आरोपी विलास दामोदर रंधये यास चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ अन्वये सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०२४ ते २५ मे २०२४ या कालावधीत अल्पवयीन पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. तसेच या घटनेबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३३/२०२४ दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम ३७६(३), ३७६(२)(एन), ३७६(२)(एफ), ५०६ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अनुराधा फुकट यांनी करून आरोपीविरुद्ध चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीअंती न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी विलास दामोदर रंधये यास पोक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर आणि नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.

न्यायालयीन कामकाजात पोलीस उपनिरीक्षक कुंदन वाघमारे व महिला पोलीस अंमलदार प्रिती पिंगे यांनी कोर्ट पैरवीची जबाबदारी पार पाडली. सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप बा. नागपूर यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली जाऊन आरोपीस शिक्षा होण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली.

Previous Post Next Post