Top News

नागभीड येथील ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 



नागभीड : समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे विद्यार्थ्यांसह शिक्षक, वाहनचालक व कंडक्टर यांच्यासाठी वाहतूक नियमांबाबत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर यांच्या सूचनेनुसार व संस्थेचे सचिव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या शुभांगी पोहेकर आणि मुख्याध्यापिका संगीता नारनवरे मंचावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमात वाहतूक पोलीस रामेश्वर डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक, शालेय वाहनचालक व कंडक्टर यांना वाहतूक नियमांमध्ये झालेले बदल, रस्त्यावर वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता, वाहतूक नियमांचे पालन, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक तसेच शालेय वाहनांशी संबंधित आवश्यक नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.



विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी, पादचारी व वाहनचालकांनी कोणत्या नियमांचे पालन करावे, तसेच शाळेत ये-जा करताना सुरक्षिततेला कसे प्राधान्य द्यावे, याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वाहनचालक व कंडक्टर यांनी अधिक जबाबदारीने व सतर्कतेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

आजच्या काळात वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व शालेय वाहतूक व्यवस्थेशी संबंधित कर्मचाऱ्यांमध्येही वाहतूक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेले मार्गदर्शन त्यांच्या दैनंदिन जीवनात निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शाळेच्या वतीने वाहतूक पोलीस रामेश्वर डोईफोडे यांचे आभार मानण्यात आले.

Previous Post Next Post