नागभीड : जि.प. पारडी-बाळापूर क्षेत्रातील मिंडाळा–राजोली–बोंड–पारडी (जाटिंग)–देवपायली–बाळापूर (बुज.) तसेच राजोली–गोवारपेठ–ब्रह्मपुरी या जंगलमार्गावर अनेक ठिकाणी रस्ते फुटत असल्याने नवख्या प्रवाशांना योग्य मार्ग शोधताना मोठी गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा नेते संजय गजपुरे यांनी पुढाकार घेत या मार्गावरील आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक उभारले आहेत.
दाट जंगल, निर्जन परिसर तसेच वाघ, अस्वल, बिबट्या यांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर असल्याने या मार्गावर रस्ता विचारण्यासाठी नागरिक सहज उपलब्ध होत नाहीत. परिणामी परिसराची माहिती नसलेले वाहनचालक अनेकदा चुकीच्या मार्गाने जात होते. विशेषतः पावसाळ्यात जंगल अधिक दाट झाल्यानंतर ही समस्या गंभीर होत होती.
मिंडाळा, राजोली, बोंड, पारडी (जाटिंग), देवपायली आणि बाळापूरकडे जाणाऱ्या मार्गांवर अनेक फाटे आहेत. तसेच राजोलीमार्गे गोवारपेठहून ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या मार्गावरही योग्य दिशादर्शक फलकांचा अभाव होता. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये नेमका कोणता मार्ग घ्यायचा, याबाबत संभ्रम निर्माण होत असे.
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन संजय गजपुरे यांनी स्वतःच्या पुढाकारातून आवश्यक असलेल्या चार ते पाच ठिकाणी दिशादर्शक बॅनर लावले आहेत. या फलकांवर विविध गावांच्या दिशांची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता या जंगलमार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना योग्य दिशा सहज ओळखता येणार आहे.
सार्वजनिक निधीची प्रतीक्षा न करता नागरिकांना भेडसावणारी प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर तातडीने उपाय करण्याचा हा उपक्रम त्यांच्या लोकाभिमुख कार्याचे उदाहरण ठरत आहे. जंगलातील मार्गावर उभारण्यात आलेले हे दिशादर्शक फलक प्रवाशांसाठी केवळ मार्गदर्शक ठरणार नसून अनोळखी रस्त्यावर होणारी भटकंती टाळण्यासाठी महत्त्वाची मदत ठरणार आहेत.
दरम्यान, नागरिकांची छोटीशी अडचणही दूर झाली पाहिजे, या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

