नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी होणारी आरक्षण सोडत जन्माष्टमीच्या दिवशी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याने जि.प.चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात याच दिवशी ‘कानोबा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने आरक्षण सोडत इतर दिवशी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार नागभीड तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ४ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासंदर्भात नागभीड तहसीलदारांनी संबंधित लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्ष पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र, ४ सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही तारीख अडचणीची ठरू शकते. अनेक गावांमध्ये ‘कानोबा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तसेच दहीहंडीचेही आयोजन करण्यात येते.
सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने आरक्षण सोडतीकडे अनेक इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत सणाच्या दिवशीच आरक्षण सोडत घेण्यात येणार असल्याने राजकीय कार्यकर्ते, नागरिक तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थितीबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जन्माष्टमीचा दिवस वगळून इतर दिवशी सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात यावी, अशी मागणी संजय गजपुरे यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून आरक्षण सोडतीच्या तारखेबाबत फेरविचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
