बल्लारपूर : दारूच्या नशेत बेफाम वेगाने बोलेरो पिकअप चालवणाऱ्या चालकाने रस्त्यातील वाहनांना धडक देत एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची दुर्दैवी घटना बल्लारपूर शहरातील जी. एन. कॉलेज परिसरात घडली. या भीषण अपघातात मेडिकल व्यावसायिक अरशद खान यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पुढे एका गावाजवळ त्याच्या बोलेरो पिकअपची समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अरशद खान हे आपले मेडिकल दुकान बंद करून नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक MH 34 CG 7786 ने बामणीच्या दिशेने जात होते. याचदरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक MH 32 Q 2595 ने जी. एन. कॉलेज परिसरात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की अरशद खान गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, दुचाकीला धडक देण्यापूर्वी या बोलेरो चालकाने एका कारला तसेच एका गाईला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. अरशद खान यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. पुढे एका गावाजवळ त्याच्या बोलेरो पिकअपची समोरून येणाऱ्या ट्रकला भीषण धडक झाली. या घटनाक्रमात अन्य तीन ते चार नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविला आहे.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
