नागभीड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना जागविण्यासाठी नागभीड येथे आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. आमदार साहेबांच्या नागभीड येथील कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली. विविध गावांमधून मार्गक्रमण करत रॅली तळोधी येथे पोहोचली.
रॅलीच्या मार्गावर गावोगावी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी तिरंगा बाईक रॅलीवर फुले उधळून स्वागत करण्यात आले. हजारो बाईकस्वार महिला व पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते. प्रत्येक बाईकवर डौलाने फडकणारा तिरंगा आणि हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जयघोषांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला. तरुणांसह महिला, पुरुष आणि विविध वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. रॅलीदरम्यान दिसणारा उत्साह, जोश आणि तिरंग्याविषयीचा अभिमान वातावरणात प्रकर्षाने जाणवत होता.
नागभीड येथून सुरू झालेली तिरंगा बाईक रॅली विविध गावांमधून मार्गक्रमण करत तळोधी येथे पोहोचली. तळोधी गावातून रॅलीचे भ्रमण केल्यानंतर साई मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांचे बलिदान, त्याग आणि देशासाठी केलेले कार्य पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहावे, तसेच नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाप्रती असलेली निष्ठा जपण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
या रॅलीत आमदार बंटी भांगडिया यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूकर, भाजपा ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे, नागभीड मंडळ अध्यक्ष संतोष रडके, तळोधी मंडळ अध्यक्ष हेमंत लांजेवार, महिला तालुकाध्यक्ष नितु गुरुपुडे, नगरसेवक सचिन आकुलवार, नगरसेवक हेमंत नन्नावरे, नगरसेविका प्रिया लांबट, नगरसेविका शिल्पा शेंडे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तिरंग्याने सजलेल्या हजारो बाईक, देशभक्तीच्या घोषणा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे नागभीड परिसरात तिरंगा बाईक रॅलीने देशभक्तीचा अनोखा जागर घडवून आणला.





