नागभीड : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील प्राणीशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि साईनाथ ब्लड बँक अँड कंपोनंट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. किशोरभाऊ वनमाळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महाविद्यालयात ‘रोगनिदान व रक्तदान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरात ५२ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तर २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश समाजात, विशेषतः तरुणांमध्ये रुजावा, विविध रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच युवकांना रक्तदानासाठी प्रेरित करावे, या उद्देशाने संस्थेचे सचिव मनोजभाऊ वनमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून साईनाथ ब्लड बँक अँड कंपोनंट, नागपूरचे संचालक डॉ. अनिल ढोणे उपस्थित होते. डॉ. विकास मोहतुरे यांनी मार्गदर्शन केले, तर प्रा. किशोर बोरकर यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी डॉ. विकास मोहतुरे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना, “रक्तदान हे सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ दान असून प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे,” असे आवाहन केले. डॉ. अनिल ढोणे यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि समाजासाठी असलेली त्याची उपयुक्तता स्पष्ट केली.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख म्हणाले की, “स्व. किशोरभाऊ वनमाळी यांच्या स्वप्नातील आदर्श महाविद्यालय घडविण्यासाठी आपण निरंतर प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. रक्तदानाचा उपक्रम हा सामाजिक सेवेचा महत्त्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे यावे.”
शिबिरामध्ये एकूण ५२ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महाविद्यालयातील ११ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रचल ढोक यांनी केले, तर प्रा. चक्रधर भुर्रे यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच साईनाथ ब्लड सेंटर, नागपूर यांच्या चमूचे मोलाचे सहकार्य लाभले.
