पर्यटकांची संभाव्य गर्दी, वन्यप्राण्यांचा वावर आणि जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचा निर्णय
नागभीड : स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सर्वत्र सुट्टी असते. त्यातच सलग सुट्ट्यांमुळे घोडाझरी पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन घोडाझरी पर्यटनस्थळ १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, सिंदेवाही यांचे ३ ऑगस्ट २०२६ रोजीचे पत्र तसेच तहसीलदार, नागभीड यांचे १२ ऑगस्ट २०२६ रोजीचे पत्र प्राप्त झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नसलेल्या पर्यटनस्थळांना गर्दीच्या काळात बंद ठेवण्याच्या सूचना या पत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत.
घोडाझरी वॉटर फॉल हे वनक्षेत्राला लागून असून तलावाचे पाण्याचे क्षेत्रही विस्तृत आहे. तलावालगतच्या वनक्षेत्रात वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक एकत्र आल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पर्यटकांकडून मनमानीपणे ठिकठिकाणी वावर केला जात असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणेही कठीण होत असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.
याशीवाय तलावाच्या पाण्यात पोहणे किंवा पाण्यात जाण्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असून, यापूर्वी तलावात बुडून जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून तसेच पाण्यात बुडून होणारी संभाव्य जीवितहानी टाळणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत घोडाझरी पर्यटनस्थळ बंद राहणार असल्याने पर्यटकांनी या कालावधीत पर्यटनस्थळी येऊ नये, तसेच वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
