नागभीड : नागभीड पोलिसांनी मौजा म्हसली येथील शंकरपटाच्या बाजूला सुरू असलेल्या ५२ पानी जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ९ जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह एकूण १६ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना म्हसली परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार २० ऑगस्ट २०२६ रोजी नागभीड पोलिसांच्या पथकाने शंकरपटाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी आशिष मेश्राम (४२, रा. पाहर्णी, ता. नागभीड), हिवरसिंग जुनी (२१, रा. जांभुळघाट, ता. चिमूर), सुनील नारनवरे (३०, रा. पाहर्णी, ता. नागभीड), नितेश मानकर (३०, रा. शंकरपूर, ता. चिमूर), शरद रामटेके (५२, रा. पाहर्णी, ता. नागभीड), स्वप्नील अलोने (२९, रा. शिवनी, ता. सिंदेवाही), गिरीध्र उंबरकर (४९, रा. ढोरपा, ता. नागभीड), नरेश खोब्रागडे (४८, रा. रामाळा, ता. सिंदेवाही) आणि संदिप मुंगमोडे (३५, रा. उटीमाल, ता. सिंदेवाही) हे जुगार खेळताना आढळून आले.
दरम्यान, आकाश पारखी (३०, रा. विलम, ता. नागभीड) हा कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध नागभीड पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ पानी पत्ते, डावावर लावलेली १ हजार २७० रुपयांची रोख रक्कम तसेच आरोपींच्या अंगझडतीतून १५ हजार रुपये, असा एकूण १६ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर आरोपी ५२ पानी पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतीचा जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर आणि नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, पोलीस उपनिरीक्षक भोजराम लांजेवार, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस अंमलदार विलास बालमवार आणि विक्रम आत्राम यांच्या पथकाचा सहभाग होता.
