Top News

योगेश मुऱ्हेकर यांच्यावर शिवसेना श्रमिक कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

 





चंद्रपूर  : पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘युवा शक्ती ग्राम विकास संघटने’चे जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर यांची शिवसेना श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील सक्रिय योगदानानंतर आता कामगारांच्या हक्कांसाठी संघटनात्मक पातळीवर काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. शिवसेना श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश सचिव अमित आर. भटपार यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत नियुक्तीपत्र महाराष्ट्राचे कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नागपूर येथील रवी भवन येथे योगेश मुऱ्हेकर यांना प्रदान करण्यात आले.

या नियुक्तीसाठी शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी विशेष पाठपुरावा केला. मुऱ्हेकर यांच्या सामाजिक, पत्रकारिता आणि ग्रामविकास क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांच्यावर जिल्हास्तरीय कामगार संघटनेची जबाबदारी सोपविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देणारे मुऱ्हेकर आता संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांना संघटित करणे, त्यांच्या हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी प्रभावीपणे आवाज उठविणे, कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे तसेच शिवसेना श्रमिक कामगार संघटनेची जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक बांधणी करणे, हे त्यांच्या पुढील कार्याचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

मुऱ्हेकर यांच्या नियुक्तीची माहिती समोर येताच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, कामगार, पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे सहकारी, मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post Next Post