Top News

Seed Capital Scheme for Transgender Community : तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना; स्वयंपूर्ण रोजगाराला चालना

 Seed Capital Scheme for Transgender Community : तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना; स्वयंपूर्ण रोजगाराला चालना



चंद्रपूर, दि. 19 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना स्वयंपूर्ण रोजगार आणि व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी “बीज भांडवल योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या योजनेंतर्गत तृतीयपंथीयांना विविध लघुउद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून 25 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनविण्यावर भर देण्यात येणार आहे.

45 टक्के शासन अनुदान

योजनेच्या निधी संरचनेत 45 टक्के शासन अनुदान, 50 टक्के बँक कर्ज आणि 5 टक्के लाभार्थी हिस्सा असा समावेश आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजदरात 3 टक्क्यांपर्यंत सवलतही मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामिनदाराची किंवा तारणाची आवश्यकता नसल्याने अधिकाधिक लाभार्थ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.


योजनेसाठी पात्रता

  • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे
  • महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्षांचा रहिवासी असावा
  • समाज कल्याण विभागाने दिलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे आवश्यक

येथे करा संपर्क

इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

Previous Post Next Post