Top News

बहुआयामी व्यक्तिमत्व - तर्वेकर साहेब.

#लेख 

बहुआयामी व्यक्तिमत्व - तर्वेकर साहेब.


लेखक : उपासराव समर्थ

सहाय्यक शिक्षक : ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड



विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

    तसं पाहायचं झालं तर नागभीड हा राजकीय दृष्ट्या मागासलेलं शहर. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पूर्ण झाली असली तरी  राज्याच्या व देशाच्या राजकारणावर छाप पडावा, असा एकही राजकीय पुढारी या नगरीतून उदयास आला नाही. बाहेरून आलेल्यांनीच मतदारसंघावर पकड मिळवली. येथील स्थानिक नेतेमंडळींना आपापल्या राजकीय पक्षांच्या वरिष्ठांची मन जिंकणे जमले नाही. त्यामुळे नागभिड बाहेरील उमेदवार मतदारसंघावर थोपविण्यावाचून पर्याय पक्षश्रेष्ठींसमोर उरत नसे. असा आजवरचा इतिहास असला तरी मागील काही वर्षांत चित्र झपाट्याने बदलत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे या परिसरातील उभरतं कुशल नेतृत्व.......

वरील शेवटची ओळ लिहिताच आपसूकच एकच चेहरा आपल्या सर्वांच्या दृष्टिपथास पडतो आणि तो म्हणजे तर्वेकर साहेबांचा. कारण क्षेत्र कोणतेही असो, मग ते सामाजिक असो, राजकीय असो वा सांस्कृतिक असो,  सर्वच क्षेत्रात आपली निर्विवाद छाप पाडण्यात साहेबांना यश प्राप्त झाले. आज नागभिड नगरीचा आमदारांच्या कृपेमुळे झपाट्याने कायापालट होत असला तरी यामागची  कल्पकता आमच्या साहेबांचीच, हे नागभिड नगरीतील लहान थोरांना ठाऊक आहे.

साहेब अध्यक्ष असलेल्या समिधा सेवा संस्थेद्वारे संचालित ट्विंकल इंग्लिश स्कूल मध्ये रुजू झाल्यापासून मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या देदीप्यमान कार्यशैलीचे दर्शन मी याची देही याची डोळा पहात आहे. नागपूर रोडवरील पेट्रोल पंपचे मालक, परिसरातील सर्वात श्रीमंत अशा विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यकारी सोसायटी यासारख्या समित्यांचे तसेच सन्मित्र व धनश्री बँकेचे संचालकपदाची तसेच नगर परिषदेचे उपाध्यक्षपदाची व पवनीस्थित वैनगंगा विद्यालय व नागपूरमधील विद्यालय आणि ट्विंकल इंग्लिश स्कूल या नावारूपास आलेल्या आपल्या परिसरातील एकमात्र शाळेला संचालित करणाऱ्या 'समिधा सेवा संस्था' चे अध्यक्षपद साहेब अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. तसेच नगराच्या विकासासाठी सर्वतोपरी योगदान देण्यात साहेब कुठेच कमी पडत नाहीत. कदाचित त्यांच्या ठिकाणी दुसरी व्यक्ती असती तर यापैकी अनेक पदांचे राजीनामे देऊन या व्यापातून सुटका केली असती. पण आव्हानासमोर झुकणे हा साहेबांचा बाणा नाही. आज संपूर्ण राज्य आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. तसेच चिमूर मतदार संघावरसुद्धा याच पक्षाचे आमदार मागील दोन विधानसभा निवडणुकींपासून आहेत. या निवडणुकांमध्ये नागभिड शहरात विद्यमान आमदारांना निर्णायक आघाडी मिळवून देण्यात तर्वेकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामूळे येत्या निवडणुकीतही पक्षाची संपूर्ण भिस्त तर्वेकर साहेबांवर आहे. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आगामी निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश संपादुन देण्यात साहेब कुठेच कमी पडणार नाहीत. त्यामुळेच की काय,  भावी आमदार म्हणून लोक त्यांच्याकडे बघतात. म्हणूनच आज त्यांच्या शब्दांना विशेष मान भाजप पक्षात व जनसामान्यांत आहे. मतदारसंघात भाजपत अनेक दावेदार असले तरी सरांकडे असलेल्या नेतृत्व, वक्तृत्व व कर्तृत्व या त्रिगुणांच्या बळावर भविष्यात त्यांना आमदारकी चालून आल्यास नवल वाटायला नको. 

एकीकडे हा सर्व व्याप सांभाळत असताना कुटुंब दुर्लक्षित होणार नाही याची साहेबांनी पुरेपूर काळजी घेतली. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या त्यांच्या मातोश्री स्व. सरस्वती तर्वेकर यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तब्बेतीची काळजी साहेबांनी घेतली. एवढ्यावरच न थांबता नव्यानेच सुरू झालेल्या महिला महाविद्यालयाला आपल्या मातोश्रींचे नाव देऊन त्यांच्याप्रती असलेल्या प्रेमाचं परिचय त्यांनी दिला. सोबतच कामाच्या व्यापात साहेब गुंतले असेल तरी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि मुलांची विशेषत्वाने काळजी घेतात. या सर्व बाबींचा त्यांच्या जनसंपर्कावरही किंचितही परिणाम पडला नाही. एखाद्याच्या घरी असलेल्या कार्यक्रमात सरांची उपस्थिती नसेल असं क्वचितच होत असते. उशिरा का होईनात सर आवर्जून त्याठिकाणी उपस्थिती दर्शवितातच. त्यामुळेच भेडसावणाऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे घेऊन लोक त्यांच्याकडे येताना दिसतात व त्या समस्यांची सोडवणूक करण्यात कुठलीही कसर साहेब सोडत नाहीत. त्यामुळे शहरामध्ये विकासपुरुष अशी ओळख साहेबांची झालेली आहे. 

तर्वेकर साहेबांचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ .... आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना आपल्याच शहरात दर्जेदार व किफायती शिक्षण मिळावे म्हणून दोन दशकांपूर्वी ट्विंकल इंग्लिश स्कूलची पायाभरणी केली. आणि या शाळेच्या माध्यमातून नागभीड तालुक्यातीलच नव्हे तर गडचिरोली भामरागड चिमूर यासारख्या अतिदुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी यथोचित सुविधा त्यांनी  संस्था सचिव अजयजी काबरा यांना सोबत घेऊन उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे साहेब आणि काबरा साहेब ही गोड जोडी संपूर्ण जिल्ह्याभरात नावारूपास आली. साहेबांविषयी लिहिण्यासारखं खूप आहे, परंतु घड्याळात आता सव्वा बारा वाजलेले आहेत, त्यामुळे माझ्या लिखाणाला थांबवित साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. व आपणास प्रदीर्घ व निरोगी आयुष्य लाभो व आपल्या नेतृत्वात नागभिड शहराचा विकास होवो तसेच आपल्याला चिमूर विधानसभेचे आमदार बनण्याची भविष्यात संधी मिळो. हीच आपल्या वाढदिवसाप्रसंगी प्रभू श्रीरामचंद्रांना साकडे.


✍️उपासराव समर्थ

सहाय्यक शिक्षक :  ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड

Previous Post Next Post