Top News

RCERT Chandrapur Parent Teacher Meet 2026 : बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. अनिल चिताडे

RCERT Chandrapur Parent Teacher Meet 2026 : बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. अनिल चिताडे


आरसीईआरटी चंद्रपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक-शिक्षक मेळावा उत्साहात


चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित Rajiv Gandhi College of Engineering Research and Technology येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र 2025-26 अंतर्गत “द्वितीय पालक-शिक्षक मेळावा 2026” उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा सखोल आढावा घेऊन पालकांशी वैयक्तिक संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी, विषयांतील कमकुवत भाग, वेळेचे नियोजन, नियमित अभ्यासाची सवय, डिजिटल साधनांचा योग्य वापर तसेच करिअर मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत आपली मते व सूचना मांडल्या. या संवादातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल चिताडे , डॉ. राजेंद्र धात्रक , डॉ. सुभाष  कामडी तसेच प्रोफ . डी . बी . मेश्राम उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच नैतिक मूल्ये, संवाद कौशल्य, टीमवर्क, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले.

विभागप्रमुख डॉ. राजेंद्र के. धात्रक यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करून मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त, प्रकल्प कार्य, प्रयोगशाळेतील कामगिरी, अंतर्गत मूल्यमापन तसेच विविध तांत्रिक व सहशैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग याबाबत त्यांनी माहिती दिली.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण, संशोधन वृत्ती, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख ज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालक प्रतिनिधी म्हणून रवींद्र गणवीर आणि विनोद पेटकर यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. नियमित पालक-शिक्षक संवाद, तांत्रिक कार्यशाळा, औद्योगिक भेटी, प्रकल्पाधारित शिक्षण, करिअर मार्गदर्शन सत्रे तसेच व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सकारात्मक आणि संवादात्मक वातावरणात पार पडलेला हा मेळावा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.


Previous Post Next Post