अमृततर्फे ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण
चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात “अमृत” संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
आज शेती, भूमापन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी वाढत असून, अमृत संस्थेमार्फत 10 दिवसांचा निवासी प्रशिक्षण कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.
विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ड्रोन उडवण्याचा अधिकृत परवानाही दिला जाणार आहे. खासगी संस्थांमध्ये यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात; मात्र अमृत योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.
कोण करू शकतो अर्ज?
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना लागू आहे. यामध्ये ब्राह्मण, वैश्य, मारवाडी, राजपूत, पाटीदार, सिंधी, गुजराथी, जाट, ठाकूर, लोहाना, बनिया आदी 25 जातींचा समावेश करण्यात आला आहे.
पात्रता अटी
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- वय 18 ते 55 वर्षांदरम्यान असावे
- किमान 12 वी उत्तीर्ण असावा
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे
- शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार
येथे करा संपर्क
- अधिक माहितीसाठी अमृत चंद्रपूर जिल्हा कार्यालय, कृष्णा टॉवर जवळ, गुरुद्वारा रोड, तुकूम येथे संपर्क साधावा.
- संपर्क : विक्रममोहन पांडे
- मोबाईल : 9112228774
- ईमेल : amrut.chandrapurdm@gmail.com
अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे यांनी केले आहे.
