गुणवंतांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा गौरव
साथ फाउंडेशनतर्फे सावलीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
साथ फाउंडेशन यांच्या वतीने सावली तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा “गौरव गुणवंतांचा” सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सावली तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन रोहित बोम्मावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहित बोम्मावार होते. प्रमुख अतिथी म्हणून विनोद धुर्वे तसेच धनंजय आंबटकर उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान यामुळे कार्यक्रमाला विशेष वातावरण लाभले.
मार्गदर्शन करताना रोहित बोम्मावार यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून योग्य दिशा, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश मिळविता येते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला मुन्ना स्वामी, प्रकाश गड्डमवार, देवराव मुद्दमवार, सतीश बोम्मावार, निखील सूरमवार, भोगेश्वर मोहुर्ले, राकेश विरमलवार, मोतीलाल दुधे, मनोहर गेडाम, सुरज बोम्मावार, हिरालाल घडसे, सुनील बोमनवार, इम्रान शेख, मयूर व्यास यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ताराचंद खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक प्रफुल निरूडवार यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साथ फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
