शॉर्टसर्किटचा ज्वारी पिकावर कहर; क्षणात होत्याचं नव्हतं, शेतकरी सुरेश राठोड संकटात
शिवरतांडा येथे भीषण आग; ज्वारीचे उभे पीक, स्प्रिंकलर पाईप व ताडपत्री जळून खाक
सावळी सदोबा - विशेष प्रतिनिधी : हिरासिंग राठोड : आर्णी तालुक्यातील शिवरतांडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी सुरेश रामलाल राठोड यांच्या शेतातील उभे ज्वारीचे पीक जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण शेत धुराच्या लोटांनी व्यापले गेले. या आगीत शेतीसाठी वापरण्यात येणारे स्प्रिंकलर पाईप, ताडपत्री व अन्य साहित्यही जळून नष्ट झाले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरतांडा परिसरातील शेतामध्ये अचानक विद्युत शॉर्टसर्किट झाले. ठिणग्या पडताच कोरड्या ज्वारीच्या पिकाने पेट घेतला आणि काही क्षणांत आग संपूर्ण शेतभर पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक जळून खाक झाले होते.
या घटनेमुळे शेतकरी सुरेश राठोड यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. वर्षभराच्या मेहनतीनंतर हातात येणारे पीक डोळ्यांसमोर जळताना पाहून राठोड कुटुंब हतबल झाले. आधीच शेतीमालाला योग्य भाव नसणे, वाढते उत्पादन खर्च आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना आता या आगीने त्यांच्या अडचणीत आणखी भर घातली आहे.
घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


