मनरेगाच्या नव्या नियमामुळे मजुरांची पिळवणूक; संतापाची लाट, जुना नियम लागू करण्याची मागणी
नागभीड, विशेष प्रतिनिधी बाळकृष्ण उंबरकर : शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमामुळे मजुरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कामावर हजेरी लावण्यासाठी मजुरांचा फोटो काढण्याची पद्धत पूर्वीप्रमाणे गटाने न ठेवता आता प्रत्येक मजुराचा स्वतंत्र फोटो काढण्याचा नियम करण्यात आला आहे.
मागील वर्षापर्यंत १० मजुरांचा एक गट करून फोटो घेतला जात होता. त्यामुळे ३०० मजूर असले तरी केवळ एका तासात सर्वांची हजेरी पूर्ण होत होती. मात्र नव्या नियमामुळे प्रत्येक मजुराचा स्वतंत्र फोटो काढण्यासाठी साधारण एक मिनिट लागत असून ३०० मजुरांची हजेरी घेण्यासाठी तब्बल पाच तास लागत आहेत.
या प्रक्रियेदरम्यान मजुरांना उन्हातान्हात दीर्घकाळ थांबावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात मजुरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मजुरांनी शासनाकडे मागणी केली असून, मागील वर्षाप्रमाणे १० मजुरांचा गट करूनच फोटोद्वारे हजेरी घेण्याचा नियम पुन्हा लागू करावा, जेणेकरून मजुरांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही.
