विसावा हटवला तर आंदोलन अटळ; प्रशासनावर संघटनांचा दबाव वाढला !
नागभीड — नागभीड येथील श्रीराम मंदिराजवळील (फ्रेंड्स कॉलनी) ऐतिहासिक विसावा (इसांबा) हटविण्याच्या हालचालींमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती संघटनांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “जनतेच्या भावना डावलून कोणताही निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा स्मरणपत्रातून देण्यात आला आहे.
संघटनांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हा विसावा अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून सरकारी जागेत आहे. परिसरातील काही घरांमुळे किंवा एका व्यावसायिकाच्या सोयीसाठी तो हटविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, “हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला जात आहे का?” असा थेट सवाल प्रशासनाला करण्यात आला आहे.
ग्रामस्थांचा रोष वाढत असताना, “संपूर्ण गाव आणि हिंदू समाज या विसाव्याच्या बाजूने ठाम उभा आहे. लोकभावना दुर्लक्षित करून घेतलेला कोणताही निर्णय प्रशासनाला महागात पडेल,” असा इशारा देण्यात आला. गावापासून स्मशानभूमी दूर असल्याने हा विसावा अत्यावश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, संबंधित संघटनांनी विसाव्याचे सुशोभीकरण स्वतःच्या खर्चातून करण्याची तयारी दर्शवली असून, प्रशासनाने तात्काळ परवानगी द्यावी आणि त्या ठिकाणी सार्वजनिक पाण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
“जर प्रशासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर नागभीडमध्ये मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहील,” असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आमदार, तहसिलदार आणि पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आल्या आहेत.
सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपरोक्त निवेदन देतांना अभिषेक जयस्वाल अध्यक्ष विश्व हिंदू परिषद, शुभम सुरपाम बजरंग दल प्रमुख,साक्षी पिसे संयोजिका दुर्गा वाहिनी,जयश्री गरफडे सहसंयोजिका दुर्गा वाहिनी,अशोक पिसे, ओमप्रकाश मेश्राम, अतुल डोळस, पवन नागरे, शुभम येरणे, सूरज शास्त्रकार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
