भद्रावतीत जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा.....विद्यार्थ्यांच्या ग्राहक जागृती रॅलीने शहर दुमदुमले
भद्रावती / तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : जागतिक ग्राहक दिनानिमित्त भद्रावती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने शहरात जागरूकतेचा संदेश दिला. “जागो ग्राहक जागो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
जिल्हा परिषद तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय भद्रावती येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावती व तहसील कार्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये व जागरूकतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश भांडारकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी बंडू आकनुरवार उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका गावंडे, निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे, पुरवठा निरीक्षक वैभव सोळंके, रती मस्के, केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष प्रविण चिमुरकर, सचिव वतन लोणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मान्यवरांनी आपल्या भाषणात ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती देत विद्यार्थ्यांना सजग ग्राहक बनण्याचे आवाहन केले. डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे, फसवणूक टाळणे व ग्राहक म्हणून आपले अधिकार जाणून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्य मार्गावरून फलक हातात घेऊन ग्राहक जागृती रॅली काढली. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांविषयी जनजागृती करण्यात आली. नगरपरिषद परिसरात रॅली पोहोचताच नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन विनोद ठमके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोनल वावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत खोब्रागडे, करूणा मोघे, प्रतिक्षा बनकर, गुरूदेव बावणे तसेच शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
