Top News

घोडाझरी जंगल परिसरात विद्यार्थ्यांचे एकदिवसीय निसर्ग शिबीर; पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन

घोडाझरी जंगल परिसरात विद्यार्थ्यांचे एकदिवसीय निसर्ग शिबीर; पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन


सामाजिक वनीकरण नागभीडच्या ‘Environment Education Programme’ अंतर्गत ५ शाळांचा सहभाग




नागभीड : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नागभीडच्या वतीने ‘Environment Education Programme (EEP)’ अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना योजनेतून विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय निसर्ग शिबिराचे आयोजन १३ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. नागभीड बिटातील Ghoda Jhari Lake परिसरात आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण व वन्यजीवनाबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती देण्यात आली. 



या शिबिरात अरुणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, धर्मराज कन्या विद्यालय नवेगाव पांडव, नूतन शिवाजी विद्यालय मोहाळी, लोक विद्यालय तळोधी आणि आकाश विद्यालय मेंढा या पाच शाळांतील सुमारे १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक तसेच तज्ञ व्यक्ती सहभागी झाले.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाची टोपी, टी-शर्ट, नोट्स व पेन देऊन अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुमारे ३ ते ४ किलोमीटर पायदळ वनभ्रमंती घडवून आणण्यात आली. या दरम्यान जंगलातील विविध वृक्ष, औषधी वनस्पती, स्थलांतरित पक्षी तसेच वाघ, अस्वल आणि बिबट्यांच्या पाऊलखुणांवरून त्यांची ओळख कशी पटवायची याविषयी माहिती देण्यात आली.



यावेळी पवन नागरे, अध्यक्ष झेप निसर्गमित्र बहुउद्देशीय संस्था नागभीड तसेच अमोद गौरकर यांनी वृक्षांची ओळख, औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



यानंतर घोडाझरी परिसरातील रिसॉर्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यात सापांच्या विविध प्रजाती, विषारी व बिनविषारी सापांची ओळख, वन्यप्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व, प्लास्टिक वापर कमी करण्याची गरज, बियाणे संकलन आणि वन्यजीवांची शिकार टाळण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.



कार्यक्रमात सामाजिक वनीकरण नागभीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार, वनरक्षक एफ. एम. गव्हारे व के. पी. रणदिवे यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्ष संरक्षण आणि जंगलाचे रक्षण करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



शेवटी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना वनभोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झेप निसर्गमित्र बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अरुणभाऊ झाडे विद्यालय, नांदेडचे मुख्याध्यापक अरविंद राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि एकदिवसीय निसर्ग शिबिराची सांगता झाली.

Previous Post Next Post