Talodhi Accident : तळोधी येथे भीषण अपघात : ४ ठार, १२ जखमी; जखमींवर तातडीने उपचार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गडचिरोली | संदीप तेलंग _ जिल्हा विशेष प्रतिनिधी – गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील तळोधी येथे रविवार दि. 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने व गुणवत्तापूर्ण उपचार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुल-रामपूर येथून भाडभिडी (मो.) येथे लग्नासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ (MH 46 P 5392) या वाहनाची गडचिरोलीकडून येणाऱ्या प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल्स (MH 15 CK 5005) या वाहनाशी तळोधी येथील नवीन पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व श्री गोकुल, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होते. उपचारात कोणतीही कुचराई होऊ नये, आवश्यक औषधे, मनुष्यबळ व यंत्रणा तत्काळ उपलब्ध करून द्यावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच जखमींच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
अपघातातील जखमींना प्रथम तळोधी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नावे :
अनिकेत बर्लावार (वय २६, भाडभिडी)
आरोही मोगरकर (वय ८, गट्टेगुडा)
सुमन गव्हारे (वय ६०, कुणघाडा)
विमलाबाई गव्हारे (वय ६०, कुणघाडा)
जखमींची नावे :
गुरुदेव कुणघाडकर (वय ६०, भाडभिडी)
सुधाकर कुणघाडकर (वय ६०, भाडभिडी)
वेदांत वैरागडे (वय २२, भाडभिडी)
प्रतिमा मानमुडकर (वय ३५, गिलगाव)
निखिल दराडे (वय १७, भाडभिडी)
संजय वैरागडे (वय १७, भाडभिडी)
कुणाल कन्नाके (वय २१, भाडभिडी)
रेखा चलाख (वय ५५, जुनोना)
अमर चलाख (वय ५७, जुनोना)
देवाजी गव्हारे (वय ५५, कुणघाडा)
गुरुदास वासेकर (वय ६०, भिवापूर)


