भद्रावतीत प्रभु श्रीरामाची भव्य शोभायात्रा; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी शहर दुमदुमले
भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : भद्रावती येथील ऐतिहासिक नगरीत श्रीरामनवमी (Ram Navami) निमित्त प्रभु श्रीरामचंद्रांच्या (Lord Shri Ram) भव्य शोभायात्रेला हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विठ्ठल मंदिर देवस्थान येथील श्रीराम मंदिरातून श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी सुमारे ६.३० वाजता शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी बळवंतदादा गुंडावार, मनोहरराव पारधे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, तहसिलदार राजेश भांडारकर, ठाणेदार योगेश्वर पारधी, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते रविंद्रजी शिंदे, डॉ. विवेक शिंदे, निलेश गुंडावार, हाजी बबन सेठ, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, श्रीराम जन्मोत्सव समितीचे संयोजक चंद्रकांत गुंडावार, अध्यक्ष प्रकाश आईचंवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभु श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
शोभायात्रेच्या मार्गावर भगवे ध्वज, तोरण-पताका, रांगोळी तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे संपूर्ण मार्ग आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.
या भव्य शोभायात्रेत बँड पथक, लेझीम, झेंडा पथक, भजन मंडळ, कलशधारी महिला, डिजे तसेच रामायणावर आधारित देखावे हे विशेष आकर्षण ठरले. बालगोपालांनी स्केटिंग करत सहभाग नोंदवून उपस्थितांचे लक्ष वेधले.
‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. प्रभु श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
ही शोभायात्रा विठ्ठल मंदिर, किल्ला वार्ड, बालाजी सभागृह, भोज वार्ड, जंगल नाका, बाळासाहेब ठाकरे गेट, शिंदे पेट्रोल पंप, जुना बसस्टॉप, नाग मंदिर, लोकमान्य विद्यालय या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
या शोभायात्रेत अमित गुंडावार, राकेश खुसपुरे, मोनु पारधे, शिवा पांढरे, विशाल ठेंगणे, संजय वासेकर, प्रकाश पामपट्टीवार, नितीन कवासे, अशोक उपलंचिवार, महेश बोटुवार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक व श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम साधत भद्रावतीत श्रीरामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
