Top News

Coal Transport Pollution : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा वाहतुकीचा त्रास; प्रदूषण व अपघातांवर आ. अभिजीत वंजारी आक्रमक

Coal Transport Pollution : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा वाहतुकीचा त्रास; प्रदूषण व अपघातांवर आ. अभिजीत वंजारी आक्रमक




 चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोल वॉशरीमधून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण तसेच वाढत्या अपघातांच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आमदार अभिजीत वंजारी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

कोळसा वाहतुकीदरम्यान ट्रकवर ताडपत्री लावून धूळ व प्रदूषण रोखले जाईल, असा नियम असला तरी प्रत्यक्षात अनेक ट्रक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून पर्यावरणाचे नुकसान होत असून स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात आरटीओ विभाग आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये संगनमत असल्याची शक्यता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. प्रशासनाकडून अधूनमधून तपासणी पथके पाठवली जात असली तरी ती केवळ एक-दोन दिवस तपासणी करून परततात आणि त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय राजुरा तालुक्यासह परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते नसून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीदरम्यान अपघातांचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ओव्हरलोड ट्रक चालवणे, ताडपत्री न लावता कोळसा वाहतूक करणे अशा विविध अनियमितता मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या समस्येवर तात्पुरते नव्हे तर दीर्घकालीन व ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमदार अभिजीत वंजारी यांनी सभागृहात स्पष्ट केले. या संदर्भात सरकार कोणती ठोस पावले उचलणार आहे, असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Previous Post Next Post