चंद्रपूर जिल्हा ग्रामीणमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानास सुरुवात
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने ब्रह्मपुरी आणि ७२ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दोन दिवसीय “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान” वर्गाची सुरुवात १४ मार्च २०२६ रोजी करण्यात आली. या प्रशिक्षण वर्गांमधून पक्ष कार्यकर्त्यांना विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि जनसेवेचे ध्येय याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी ग्रामीण मंडळाच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सत्रात जिल्हाध्यक्ष हरीश ज. शर्मा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि जनसेवेचे वैचारिक अधिष्ठान यावर सविस्तर भाष्य केले. या प्रसंगी ब्रिजभूषण पाझारे, वंदना शेंडे, माणिक पाटील थेरकर, तनय देशकर, ज्ञानेश्वर दिवटे उपस्थित होते.
दरम्यान, ७२ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर ग्रामीण मंडळाच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सत्रही उत्साहात पार पडले. यावेळी तुषार देवपुजारी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाची विचारधारा, संघटन मजबूत करण्याची पद्धत तसेच समाजाभिमुख कार्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हरीश ज. शर्मा, राम लाखिया, गुरुदास कामडी, ब्रिजभूषण पाझारे तसेच मंडळ अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही प्रशिक्षण वर्गांमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला.
हा प्रशिक्षण वर्ग कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यपद्धतीची अधिक चांगली जाण देऊन जनसेवेची प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




