Chandrapur Ring Road Project : चंद्रपूर रिंग रोडसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठोस मागणी; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे लवकर निर्णयाचे संकेत
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि औद्योगिक वाहतुकीचा वाढलेला ताण लक्षात घेता चंद्रपूरसाठी स्वतंत्र रिंग रोड उभारण्याची ठोस मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. सभागृहातील अर्धा तास चर्चेदरम्यान त्यांनी चंद्रपूर रिंग रोडची अत्यावश्यकता अधोरेखित केली. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग सकारात्मक असून लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयातून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांनी दिले.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या सुमारे ४.७९ लाख असून साक्षरता दर ८९.४५ टक्के आहे. जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उद्योग, कोळसा खाणी तसेच मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक यामुळे शहरातून जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वर्ष २०२४-२५ मध्ये जवळपास ९०० अपघातांमध्ये ४३० नागरिकांचा मृत्यू झाला असून सुमारे ८०० जण जखमी झाले आहेत. चालू वर्षातही अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी रिंग रोड अत्यावश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की चंद्रपूर हे औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणारे शहर असून जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उद्योग आणि कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक शहरातून होत असते. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा मिळावी तसेच औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी नियोजनबद्ध रिंग रोड अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपूर–चंद्रपूर तसेच बल्लारपूर–राजुरा–तेलंगणा मार्गावरील वाहतूक शहरातून जात असल्यामुळे कोंडी वाढत आहे. त्यामुळे चेकबोर्डा–मोरवा–बाबूपेठ–जुनोना या मार्गावर चार ते सहा पदरी रिंग रोड विकसित करावा. हा रिंग रोड स्मार्ट आणि ग्रीन संकल्पनेवर आधारित असावा तसेच सौर उर्जेचा वापर करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काम हाती घेऊन तीन महिन्यांत डीपीआर तयार करावा, स्वतंत्र कार्यकारी अभियंता नेमावा तसेच प्रकल्पाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली. ‘रस्ते केवळ अंतर कमी करत नाहीत, ते विकासाची गाथा लिहितात. चंद्रपूरचा रिंग रोड हा जिल्ह्याच्या भविष्यातील प्रगतीचा मार्ग ठरेल,’ असेही आ. मुनगंटीवार यांनी सभागृहात नमूद केले.
यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांनी सांगितले की चंद्रपूरमधून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून औद्योगिक वाहतुकीमुळे रिंग रोडची गरज वास्तव आहे. या प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच मुंबईत यावर बैठक घेण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकल्पाबाबत सकारात्मक असून राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयातून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सभागृहाला आश्वासन दिले.
